
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने या महिन्यात सलग दोनदा अजिंक्यपद पटकावत आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च तिसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सायनाने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावित भारताचा तिरंगा डौलात फडकविला. हा किताब पटकावित सायनाने आपल्या कारकिर्दीतील दुसरे सुपर सिरीज टायटल मिळविले आहे. या आधी तिने ऑल इंडिया ग्रांपीचा किताब मिळविला होता. किताब पटकविला की खेळाडूंचा रुबाब वाढत असतो. खेळाडूचे पाय जमिनीवर राहत नाहीत पण सायनाने शिस्तबद्ध खेळाडकडेच लक्ष देत आपण देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे भान नेहमीच ठेवले आहे. विदेशी कंपन्यांच्या शीतपेयाने माझ्या देशातील युवा पीढीचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे त्यांची जाहीरात करणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन करोडोंच्या उत्पन्नावर पाणी सोडणारा गुरू व बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या पावलावर पाऊल टाकत सायनाने खेळावरच लक्ष्य केंद्रित ठेवून जाहिरातीच्या क्षेत्रापासून चार हात लांब राहण्याचे धोरण ठेवले आहे. कमी वयात मोठी कीर्ती मिळविणार्या सायनाचा १७ मार्च १९९० रोजी हरियाणातील हिसारमध्ये जन्म झाला. सायनाची आई उषा नेहवाल या हरियाणातील माजी बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. त्यामुळे घरचेच वातावरण सायनाला बॅडमिंटनसाठी पोषक ठरले. सायनाचे वडील हरविंदर सिंग यांनी तिला बॅडमिंटनबद्दल गोडी लावली आणि तिने आपले आयुष्य हैदराबादमध्ये फुलविले. सायना आणि तिचे वडील हे दोघेही सकाळी ४ वाजता उठायचे आणि २५ किमी लांब असलेल्या मैदानावर सरावासाठी तिचे वडील तिला घेऊन जायचे. त्या वेळी ती ९ वर्षांची चिमुकली होती. डिसेंबर १९९८ मध्ये सायनाचे वडील तिला लालबहादूर स्टेडियममध्ये प्रशिक्षक नानी प्रसादकडे घेऊन गेले होते. त्या वेळी तिच्यात असलेला आत्मविश्वास पाहून प्रशिक्षक प्रसाद यांनी सायनाला ‘समर ट्रेनी’ म्हणून घेतले. तेथून सायनाची बॅडमिंटन क्षेत्राची खरी सुरुवात झाली. सायनाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा तिचा जागतिक क्रमवारीत ८६ वा क्रमांक होता. तिने अनेक गाजलेल्या दिग्गज बॅडमिंटनपटूंना चारीमुंड्या चीत केले. ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. तिने इंडोनेशिया चॅम्पियन लीन वॅनचा पराभव करीत सुपर सिरीज स्पर्धा जिंकण्याचा इतिहास घडविला. प्रतिष्ठेची एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन स्पर्धा दोनदा जिंकण्याचा पराक्रम करणारी सायना पहिली भारतीय ठरली आहे. २००८ मध्ये वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकाविले होते. तिने नववे मानांकन असलेल्या जपानच्या सपाका सटोचा २१-९, २१-१८ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले होते. २१ जून २००९ रोजी ती डब्ल्यू एफ सुपर सिरीजचे जेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करणार्या सायनाला ऑगस्ट २००९ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांना द्रोणाचार्य पुरस्काराने एकाच वेळी सन्मानित करण्यात आले होते. पदकांची कमाई केल्यानंतरही सायना शांत बसली नाही. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने जानेवारी २०१० मध्ये पद्मश्री ऍवार्ड मिळविला.
आयपीएलमधील डेक्कन चार्जर्स संघाची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असलेल्या सायनाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखून प्रत्येक स्पर्धेत भारताचे नाव झळकावत राहावे हीच अपेक्षा.
आयपीएलमधील डेक्कन चार्जर्स संघाची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असलेल्या सायनाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखून प्रत्येक स्पर्धेत भारताचे नाव झळकावत राहावे हीच अपेक्षा.
No comments:
Post a Comment