ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणाला उजवी व डावी बाजू असते. मग ते प्रकरण कोणतेही असो. क्रिकेटवेड्या भारतात सलग पाच वर्षे गाजणार्या इंडियन प्रीमियर लीगच्या वाट्याला आतापर्यंत अनेक चढउतार आले. अनेकांच्या मते आयपीएल म्हणजे, मनोरंजन, तब्बल तीन तास मस्त धम्माल, उत्सुकता, चुरस, हृदयाचे ठोके चुकविणारे थरारक क्षण, सेलिब्रेशन यांचा एकोपा. तर काहींच्या मते, केवळ पैशांचा खेळ, असभ्य वर्तनुकीचा प्लॅटफॉर्म. असो, प्रत्येकाचा एखाद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. क्रिकेट म्हटलं की, अनेकांचे लक्ष टीव्हीवर केंद्रित होत असते. काही वेळेला तर ते आपल्या हातातील कामे बाजूला ठेवून चक्क क्रिकेट पाहण्यात गुंततात. कमी वेळात लक्ष्यवेधी षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना आयपीएलच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे आयपीएल अनेकांच्या पसंतीस उतरले. मात्र सतत वादाच्या भोवर्यात अडकत चाललेल्या या आयपीलला आता चक्क बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. अर्थातच त्याला कारणेही तशी आहेत.
आयपीएलमध्ये आता क्रिकेट कमी आणि स्कँडल जास्त होत आहेत. कधी शाहरूख खान दारू पिऊन धुमाकुळ घालतो, कधी मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर येते तर कधी खेळाडूंकडून पार्टीमध्ये मुलींशी छेडछाडीचे प्रकरण समोर येते. आता तर रेव्ह पार्टीमध्येही आयपीएलचे क्रिकेटपटू सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी जुहु येथील ओकवूड हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या या हायप्रोफाईल पार्टीत पुणे वॉरियर्सकडून खेळणारे वेन पार्नेल आणि राहुल शर्मा यांना अटक केली. ४ खेळाडूंना आणि काही प्रसिद्ध व्यक्ती पळून जाण्यात यश आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या पार्टीत काही चिअरलीडर्सचाही समावेश होता. यासर्व प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेली आयपीएल स्पर्धा बंद करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी तर आयपील बंद करण्यात यावी यासाठी उपोषणही केले आहे. लोकसभेत शरद यादव, लालुप्रसाद यादव, यशवंत सिन्हा, सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही या स्पर्धेवर टीका करून आयपीएल बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र ही अगदी टोकाची भूमिका असल्याचे दिसते. असे झाल्यास अनेक खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असे वाटते. अनेक जण फक्त आयपीएलच्या नकारात्मक बाबींविषयी भाष्य करतात. अर्थात यामागेही काही कारणे असतील. पण, सातत्याने याच गोष्टींवर प्रकाशझोत कशाला टाकायचा? आयपीएलमुळे बरेच चांगले खेळाडू भारताला मिळाले आहेत. आणि यापुढेही मिळतील. आयपीएलमुळे खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळत आहेत. यामुळे खेळाडू आर्थिकदृष्ट्या लवकर स्थिरावत आहेत. नवोदित खेळाडूंना आपल्या रोजचा खर्च सांभाळून खेळावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. घरच्यांचा पाठिंबा मिळत असतो. मात्र आपले करियर घडवताना होणारी धावपळ खेळाडूंचे मन व्यथित करून जात असते. त्यामुळे अशा आयपीएल लीगद्वारे मिळणार्या करारामुळे खेळाडूंच्या पैशाचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना मिटण्यास मदत होत असते. तालुका-राज्य पातळीवर खेळणार्या क्रिकेटपटूंसाठी आयपीएल हे राष्ट्रीय व्यासपीठ आहे. आजवर जे खेळाडू क्रिकेटच्या परीघापलीकडे असायचे त्यांच्यापर्यंत आयपीएलच्या रूपाने संधी मिळालेली आहे. आज या खेळाडूंमध्ये कोणताही जय, पराजय कोणत्याही क्षणी पालटण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या माध्यमातून काही खेळाडू राष्ट्रीय संघाला मिळाले आहेत. एकंदरीत पहिल्यास, आयपीएलचा केवळ तोटा नाही फायदाही आहे. त्यामुळे आयपील जरी वादाच्या भोवर्यात अडकलेले असले तरी ते बंद न करता नियमांच्या बंधनात आणावे. यामुळे काही प्रमाणात गैरवर्तवणुकीसारख्या प्रकरणांवर आळा घालता येऊ शकतो. ज्याप्रमाणे उद्योगसमूहांनी आयपीएलमध्ये गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे त्याप्रमाणे त्यांनी कबड्डी, कुस्ती अशा देशी खेळांकडेही वळवायला हवे. आयपीएलपैकी काही टक्के निधी या खेळांना मिळाला तरी यामधून अनेक गुणी खेळाडू पुढे येऊ शकतील. आयपीएलप्रमाणे इतर देशी खेळांना ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न केल्यास सर्व खेळांमध्ये समतोल साधणे सोपे जाईल आणि देशी खेळांची गुणवत्ताही अधिक सुधारेल.
No comments:
Post a Comment