Tuesday, May 22, 2012

बंदी नको बंधन हवे



  ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणाला उजवी व डावी बाजू असते. मग ते प्रकरण कोणतेही असो. क्रिकेटवेड्या भारतात सलग पाच वर्षे गाजणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या वाट्याला आतापर्यंत अनेक चढउतार आले. अनेकांच्या मते आयपीएल म्हणजे, मनोरंजन, तब्बल तीन तास मस्त धम्माल, उत्सुकता, चुरस, हृदयाचे ठोके चुकविणारे थरारक क्षण, सेलिब्रेशन यांचा एकोपा. तर काहींच्या मते, केवळ पैशांचा खेळ, असभ्य वर्तनुकीचा प्लॅटफॉर्म. असो, प्रत्येकाचा एखाद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. क्रिकेट म्हटलं की, अनेकांचे लक्ष टीव्हीवर केंद्रित होत असते. काही वेळेला तर ते आपल्या हातातील कामे बाजूला ठेवून चक्क क्रिकेट पाहण्यात गुंततात. कमी वेळात लक्ष्यवेधी षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना आयपीएलच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे आयपीएल अनेकांच्या पसंतीस उतरले. मात्र सतत वादाच्या भोवर्‍यात अडकत चाललेल्या या आयपीलला आता चक्क बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. अर्थातच त्याला कारणेही तशी आहेत.
  आयपीएलमध्ये आता क्रिकेट कमी आणि स्कँडल जास्त होत आहेत. कधी शाहरूख खान दारू पिऊन धुमाकुळ घालतो, कधी मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर येते तर कधी खेळाडूंकडून पार्टीमध्ये मुलींशी छेडछाडीचे प्रकरण समोर येते. आता तर रेव्ह पार्टीमध्येही आयपीएलचे क्रिकेटपटू सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी जुहु येथील ओकवूड हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या या हायप्रोफाईल पार्टीत पुणे वॉरियर्सकडून खेळणारे वेन पार्नेल आणि राहुल शर्मा यांना अटक केली. ४ खेळाडूंना आणि काही प्रसिद्ध व्यक्ती पळून जाण्यात यश आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या पार्टीत काही चिअरलीडर्सचाही समावेश होता. यासर्व प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेली आयपीएल स्पर्धा बंद करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी तर आयपील बंद करण्यात यावी यासाठी उपोषणही केले आहे. लोकसभेत शरद यादव, लालुप्रसाद यादव, यशवंत सिन्हा, सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही या स्पर्धेवर टीका करून आयपीएल बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र ही अगदी टोकाची भूमिका असल्याचे दिसते. असे झाल्यास अनेक खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असे वाटते.  अनेक जण फक्त आयपीएलच्या नकारात्मक बाबींविषयी भाष्य करतात. अर्थात यामागेही काही कारणे असतील. पण, सातत्याने याच गोष्टींवर प्रकाशझोत कशाला टाकायचा? आयपीएलमुळे बरेच चांगले खेळाडू भारताला मिळाले आहेत. आणि यापुढेही मिळतील. आयपीएलमुळे खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळत आहेत. यामुळे खेळाडू आर्थिकदृष्ट्‌या लवकर स्थिरावत आहेत. नवोदित खेळाडूंना आपल्या रोजचा खर्च सांभाळून खेळावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. घरच्यांचा पाठिंबा मिळत असतो. मात्र आपले करियर घडवताना होणारी धावपळ खेळाडूंचे मन व्यथित करून जात असते. त्यामुळे अशा आयपीएल लीगद्वारे मिळणार्‍या करारामुळे खेळाडूंच्या पैशाचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना मिटण्यास मदत होत असते. तालुका-राज्य पातळीवर खेळणार्‍या क्रिकेटपटूंसाठी आयपीएल हे राष्ट्रीय व्यासपीठ आहे. आजवर जे खेळाडू क्रिकेटच्या परीघापलीकडे असायचे त्यांच्यापर्यंत आयपीएलच्या रूपाने संधी मिळालेली आहे. आज या खेळाडूंमध्ये कोणताही जय, पराजय कोणत्याही क्षणी पालटण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या माध्यमातून काही खेळाडू राष्ट्रीय संघाला मिळाले आहेत. एकंदरीत पहिल्यास, आयपीएलचा केवळ तोटा नाही फायदाही आहे. त्यामुळे आयपील जरी वादाच्या भोवर्‍यात अडकलेले असले तरी ते बंद न करता नियमांच्या बंधनात आणावे. यामुळे काही प्रमाणात गैरवर्तवणुकीसारख्या प्रकरणांवर आळा घालता येऊ शकतो.  ज्याप्रमाणे उद्योगसमूहांनी आयपीएलमध्ये गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे त्याप्रमाणे त्यांनी कबड्डी, कुस्ती अशा देशी खेळांकडेही वळवायला हवे. आयपीएलपैकी काही टक्के निधी या खेळांना मिळाला तरी यामधून अनेक गुणी खेळाडू पुढे येऊ शकतील. आयपीएलप्रमाणे इतर देशी खेळांना ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न केल्यास सर्व खेळांमध्ये समतोल साधणे सोपे जाईल आणि देशी खेळांची गुणवत्ताही अधिक सुधारेल.

Friday, February 17, 2012

ओळख भारतीय सांकेतिक भाषेची

बहुभाषिक देश अशी भारताची विश्वात ख्याती. अनेक भाषांप्रमाणेच अस्तित्वात असलेली एक नैसर्गिक भाषा म्हणजे भारतीय सांकेतिक भाषा (आय.एस.एल.). ही डेफ व्यक्तींची मातृभाषा. खुणांची भाषा असेही हीची ओळख. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त भारतीय सांकेतिक भाषेची ओळख पटवून घेऊ. उल्लेखनिय म्हणजे १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते.
भारतामध्ये गेली अनेक शतके भारतीय सांकेतिक भाषा डेफ व्यक्तिंकडून वापरली जात आहे. भरतनाट्यमकिंवा भारतीय शुर्पनखेचे उदाहरण पाहता भारतामध्ये आयएसएल प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे निदर्शनात येत. आयएसएलचा अभ्यास १९८० च्या पूर्वार्धात भारतामध्ये शास्त्रीय पद्धतीने सुरु झाला.
भारतीय सांकेतिक भाषा ही भारतीय डेफ समाजाची एक अद्वितीय कृती आहे. वाचा आणि श्रवण दोष असलेल्या व्यक्तींची भारतीय सांकेतिक भाषा ही मायबोलीच. या भाषेला इतर भाषांप्रमाणे लिहिले जात नाही. मात्र दृश्य आणि श्राव्य या माध्यमातून शिकता येते. आणि व्हिडियो, कॉम्पुटर यांच्या सहाय्याने एकमेकांबरोबर अभ्यास करता येते. व्याकरण आणि भाषा याच्या प्रयोगानेच शिकता येते. आयएसएल ही भारताची आपली स्वत:ची भाषा आहे. ही भाषा दुसर्‍या भाषेशी संबंधित नाही. कोणत्याही विदेशी भाषेशीही प्रभावित नाही. भारतात दरवर्षी २७ हजार डेफ मुलं जन्माला येतात आणि पुढे ते आपापल्या क्षमतेनुसार व श्रवण क्षमतेनुसार आयएसएलचा वापर करत असतात. सध्या स्थितीत भारतात सुमारे १५ लाख व्यक्ती आयएसएलचा वापर करतात.
भारत आणि जवळपासच्या देशांमध्ये डेफ व्यक्तिंचा समुह बर्‍याच प्रमाणावर आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या अनुमानानुसार भारतात डेफ व्यक्तिंची संख्या ४ मिलियन इतकी आहे. आणि भारतातील मोठ्या शहरांमध्ये या सांकेतिक भाषांवर प्रयोग होत असतात. सांकेतिक भाषेची सुरुवात इ.पू. ५ व्या शतकात किटीलसमध्ये झाली. आपल्याला बोलत येत नाही आणि आपले म्हणने इतरांना सांगण्यासाठी हातवारे हावभाव यांचा वापर केला जात असतो. भारतीय सांकेतिक भाषा केवळ भारताताच नाही तर बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या शेजारील देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. डॉ. मदन वशिष्ट, वुड वर्ड विल्सन आणि अलराक्जेशन यांनी मिळून केलेल्या संशोधन कार्यातूनच, सांकेतिक भाषा ही डेफ समुदायाचा एक विभिन्न अंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९९०च्या दशकात डॉ. उलरीक यांनी भारतीय उपखंडातील आयएसएलचा अभ्यास केला. आणि त्यांना येथे वापरण्यात येणार्‍या या भाषेत साम्य असल्याचे आढळून आले. पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश या देशात वापरले जाणारे व्याकरण एकच आहे. आपल्या देशात श्रवण दोष असलेल्या १० लाख व्यक्ती आणि पाच लाख हेअरींग इंपेड मुले या भाषेचा वापर करतात. आज २०१२ मध्ये या आकड्यांत अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. या भाषेला अधिक व्यापकता मिळावी यासाठी भारतात सांकेतिक भाषेचा पाठ्यक्रम२००१ मध्ये भारतीय पुनर्वसन परिषद (आर. सी. आय.) यांच्या सहयोगाने अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था (ए.वाय.जे.एन.आय.एच.एच.) या मुंबईतील संस्थेत सुरु करण्यात आला. तसेच ते आय.एस.एल. शिक्षक आणि इंटरप्रीटर्सही तयार करण्याचे प्रयत्न जोमाने करत आहेत. या संस्थेने २००८ मध्ये डिप्लोमा इन साईन लँग्वेज इंटरप्रीटर कोर्सचा (डि.एस.एल.आय.सी) प्रारंभ केला. या संस्थेची भारतात सात केंद्रे आहेत आणि ४५ प्रमाणपत्रधारक इंटरप्रीटर्स आहेत. डेफ व्यक्तिंचा समावेश हा अपंगत्व समुदायात केला जातो. या समुदायात सात प्रकारच्या अपंग गटाचा समावेश आहे. समाजात या समुदायाला समान अधिकार मिळावा यासाठी भारत देश विश्व स्तरावर करारबद्ध झाला आहे. या कार्यासाठी अली यावर जंग ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. केवळ डेफ व्यक्तीच नाहीत तर नॉर्मल व्यक्तींही ही भाषा शिकण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसते.
के. सी. मार्ग वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे पश्चिममुंबई ५० येथे असलेली अली यावर जंग या संस्थेची स्थापना ९ ऑगस्ट १९८३ रोजी झाली. सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेशी संपर्क साधण्यासाठी ०२२-२६४० ०२१५ / ०२२८ असा दुरध्वीनी क्रमांक आहे तसेच ayjnihhmum@gmail.com संकेत स्थळही उपलब्ध आहे. अली यावर जंग आणि मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग (MCJ ) यांनी संयुक्तरीत्या एक वर्षाचा कालावधी असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मिडिया ऍण्ड डिसऍबिलीटी कम्युनिकेशन या कोर्सची सुरुवात २०१२ सालापासून केली आहे. ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि युनिव्हर्सल डिझाईन हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. मिडिया क्षेत्रात या स्पेशलायझेशनच्या आधारावर विद्यार्थी आपली कारकिर्द घडवू शकतो. या एक वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि प्रोडक्स शिकण्याची संधी आहे. ऍक्सेसिबल फॉर्मेटमध्ये शॉर्ट फिल्म्स बनविणे, डिझिटल मिडियाचे मार्केट वाढविणे, कॅप्शनिंग, ऑडिओ डिस्क्रिप्शन, भारतीय सांकेतिक भाषा आणि ऍक्सेसिबल संकेत स्थळ बनविणे हे केवळ शिकण्यासच नाही तर आपल्याला प्रॅक्टिकली करण्याची सुवर्ण संधी मिळते. या कोर्सची फी १९ हजार रुपये आहे मात्र हॉस्टेलची सुविधा पाहिजे असल्यास ३१,६०० अशी रक्कम आकारण्यात येते. हा कोर्स करण्याची संधी केवळ ज्यानी पत्रकारितेत डिप्लोमा किंवा डिग्री किंवा पब्लिक रिलेशन कोर्स केलेला असेल त्यांनाच मिळणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
सर्वच डेफ मुलांनी भारतीय सांकेतिक भाषा शिकण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. तसेच इंटरप्रीट्‌र्स असलेले टिव्ही चॅनल्सही पाहिले पाहिजे. नॉर्मल व्यक्तिंनी ही भाषा शिकून डेफ समुदयाशी संवाद साधला पाहिजे. अनुसुचित यादीत या भाषेला स्थान मिळावे यासाठी अली यावर जंग प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाकडे आकर्षित होण्यासाठी अली यावर जंग ही संस्था व्हीडिओ रिमोट इंटरप्रीटींग सर्विसचा वापर करत असून ते लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्नही करत असल्याचे अली यावर जंग या राष्ट्रीय विकलांग संस्थेचे संचालक प्रो. आर. रंगासाई यांनी म्हटले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, April 23, 2011

सचिन तुझ्या वाढदिवसानिमित्ताने...


विश्वविजत्या संघाचा सदस्य असल्याचा अभिमान बाळगणारा आंतरराष्ट्रिय कारकीर्दीतील चमकदार २१ वर्षे पूर्ण करणारा विश्वविक्रमादित्य, वंडरबॉय सचिन तेंडुलकर उद्या आपल्या ३८ व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. विश्वविजेत्या संघाचा सदस्य झाल्यानंतर येणारा हा सचिनचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे आधी झालेल्या वाढदिवसांच्या तुलनेत या वाढदिवसाचा गोडवा काही वेगळाच असणार आहे. सचिनने कराची येथे १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सुरु झालेल्या कसोटी सामन्यामधून आंतराष्ट्रिय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने १७७ कसोटी सामन्यात ५६.९४ च्या सरासरीने १४६९२ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ५१ शतके आणि ५९ अर्धशतके झळकाविली आहेत. तर ४५३ एकदिवशीय सामन्यात ४५.१६ च्या सरासरीने १८११ धावा फटकाविल्या आहेत. यामध्ये त्याने ४८ शतके तर ९५ अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने एकूण ९९ शतके आणि १५४ अर्धशतके साजरे केले आहेत. एवढेच नव्हेतर तो सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या चौथ्या पर्वात सामने खेळत धावांसमवेत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने सुरुवातीपासून ऑरेज कॅप आपल्या कडेच राखली होती. मात्र एकाधावाने पंबाजच्या वल्थॅटीने ती आपल्याकडे घतेली आहे. एवढे करुनही त्याची धावांची भूक क्षमलेली दिसत नाही. यावेळीही त्याला आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम लांबणीवर टाकावा लागण्याची शक्यता वाटते कारण त्याच्या वाढदिवशीच मुंबईला डेक्कनविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याने यावेळी जर मुंबईला आयपीएलच्या चौथ्या सत्राचे अजिंक्य ठरविलेतर ही एक त्याच्या चाहत्यांनाच भेट असेल. त्याला आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. कधी टेनिस एल्बोने पाठीच्या दुखण्याने तर कधी इतरांच्या टीकेने त्याला बेजार व्हावे लागले. मात्र सचिनने कधीही असभ्य वर्तवणुक केली नाही. शरीराच्या त्रासावर मात करीत त्याने कारकिर्दीकशी अधिक फुलेल याकडे लक्ष दिले. तर अनेकांच्या टीकांना त्याने नेहमीच आपल्या बॅटने प्रत्त्युत्तरे दिली आहेत. भारतीय क्रिकेटरसिंकांच्या गळ्यातील ताईत आणि क्रीडा रसिकांच्या दृष्टिने जणू देवच असणार्‍या सचिनचे क्रिकेटसाठीचे असणारे योगदान महत्वाचे आहे. आपल्या या क्रिकेट कारकर्दित सचिनने अनेक विक्रम आपल्या नावार नोंदविले आहेत. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. सचिनला १९९८ साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याने आपल्या कर्तृत्वाने क्रीडा क्षेत्रातून देशाचे नाव उज्वल कले आहे. वाढत्यावयानुसार त्याची खेळी अधिकाधिक बहरताना दिसते आहे. त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखावे आणि तमाम क्रिकेटरसिंकांना आपल्या खेळी सतत आनंद देत राहावे हीच अपेक्षा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Saturday, February 19, 2011

सोन्याने मढलेला विश्वचषक


शनिवारपासून ढाक्यामध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषक महामेळाव्यात सहभागी झालेले प्रत्येक संघ ११ किलोग्रॅम वजनाच्या सुवर्णजडीत विश्वचषकासाठी झुंज देत आहे. दोन एप्रिल रोजी वानखेड़े मैदानावर जो चकाकणारा चषक असणार आहे तो वास्तविकतेत विश्वचषकाची प्रतिकृती आहे, ज्यामध्ये मागील विजेत्यांची नावे वगळता इतर कोणताही बदल केलेला नाही. सोने आणि चांदीपासून मढविण्यात आलेल्या या विश्वचषकासाठी १४ संघांमध्ये झुंज होत आहे. हा विश्वचषक १९९९ मध्ये गेर्राड ऍण्ड कंपनीच्या कामगारांनी दोन महिन्यांच्या अंतरामध्ये कठोर परिश्रम घेत केला आहे. गेर्राड ऍण्ड कंपनी ब्रिटनच्या शाही कुटुंबाचे ज्वेलर्ससुद्धा आहे. या चषकात महत्त्वाची बाब अशी आहे की, यामध्ये क्रिकेटला पूर्णतः परिभाषित केले आहे. यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागाचा खूपच आकर्षक तर्हेने समावेश केला गेला आहे. चषकाची एकूण लांबी ६० सेंटीमीटर आहे. या चषकाला तीन स्तंभांच्या आधारावर वरती सुवर्ण ग्लोब आहे. चषकावर लावण्यास आलेले तिन्ही स्तंभ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. याच्या खालच्या भागात विजेत्यांची नावे लिहिली आहेत आणि यात आणखी दहा संघांची नावे बसू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील दहा विश्वचषक स्पर्धेमध्ये या चषकाला कायम करायचे म्हटले तरी असे ते करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे विश्वचॅम्पियन संघाला जो चषक दिला जाईल त्यामध्ये मागील विजेत्यांची नावे नाहीत. आयसीसीने मुख्य ट्रॉफी दुबईमध्ये असलेल्या आपल्या मुख्यालयात ठेवली आहे, तर विजेत्या संघाला विश्वचषकाची प्रतिकृती दिली जाते. चॅम्पियन संघाला देण्यात येणारा चषकसुद्धा मागील चॅम्पियनच्या नावाला वगळता मुख्य चषकासारखाच आहे.
खरंतर आधी विजेत्या संघाला मुख्य चषक आयसीसीला परत करावा लागत होता, मात्र आता विजेता संघ स्थायी स्वरूपात दिला जाणारा चषक आपल्याकडे ठेवू शकतो. विश्वचषकाची सुरुवात १९७५मध्ये झाली होती, मात्र १९९९मध्ये हा चषक स्थायी स्वरूपात देण्यात येऊ लागला. याआधी जेव्हा कधी नवा प्रायोजक मिळाला, तर चषकसुद्धा बदलण्यात येत होता. आयसीसीनेसुद्धा फिफाच्या तर्हेने पहिल्यांदा १९९९ मध्ये स्वतःचा चषक तयार केला आणि विजेत्या संघाला तो देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या तीन विश्वचषकांचे प्रायोजक पूडेंशियल कंपनी होती. त्यामुळे त्या चषकाला पूडेंशियल चषक म्हटले जात होते. त्यानंतर १९८७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानने विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद स्वीकारले तेव्हा रिलायन्स हा मुख्य प्रायोजक होता. त्यामुळे या चषकाचे नाव रिलायन्स चषक असे नाव पडले होते. अशाच तर्हेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषकाला बेंसेन ऍण्ड हेजज विश्वचषक आणि याच्या चार वर्षानंतर १९९६ मध्ये भारतीय उपखंडात खेळले गेलेल्या स्पर्धेला विल्स विश्वचषक अशा नावाने ओळखले जाऊ लागले होते. आयसीसीच्या या स्पर्धेचे आतासुद्धा अनेक प्रायोजक आहेत, मात्र त्यांची नावे चषक किंवा विश्वचषकाशी जोडले जात नाही. आता या स्पर्धेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि चषकाला आयसीसी चषक म्हटले जाते.

Thursday, June 24, 2010

बॅडमिंटन क्षेत्रात सायनाची भरारी


भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने या महिन्यात सलग दोनदा अजिंक्यपद पटकावत आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. सायनाने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावित भारताचा तिरंगा डौलात फडकविला. हा किताब पटकावित सायनाने आपल्या कारकिर्दीतील दुसरे सुपर सिरीज टायटल मिळविले आहे. या आधी तिने ऑल इंडिया ग्रांपीचा किताब मिळविला होता. किताब पटकविला की खेळाडूंचा रुबाब वाढत असतो. खेळाडूचे पाय जमिनीवर राहत नाहीत पण सायनाने शिस्तबद्ध खेळाडकडेच लक्ष देत आपण देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे भान नेहमीच ठेवले आहे. विदेशी कंपन्यांच्या शीतपेयाने माझ्या देशातील युवा पीढीचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे त्यांची जाहीरात करणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन करोडोंच्या उत्पन्नावर पाणी सोडणारा गुरू व बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या पावलावर पाऊल टाकत सायनाने खेळावरच लक्ष्य केंद्रित ठेवून जाहिरातीच्या क्षेत्रापासून चार हात लांब राहण्याचे धोरण ठेवले आहे. कमी वयात मोठी कीर्ती मिळविणार्‍या सायनाचा १७ मार्च १९९० रोजी हरियाणातील हिसारमध्ये जन्म झाला. सायनाची आई उषा नेहवाल या हरियाणातील माजी बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. त्यामुळे घरचेच वातावरण सायनाला बॅडमिंटनसाठी पोषक ठरले. सायनाचे वडील हरविंदर सिंग यांनी तिला बॅडमिंटनबद्दल गोडी लावली आणि तिने आपले आयुष्य हैदराबादमध्ये फुलविले. सायना आणि तिचे वडील हे दोघेही सकाळी ४ वाजता उठायचे आणि २५ किमी लांब असलेल्या मैदानावर सरावासाठी तिचे वडील तिला घेऊन जायचे. त्या वेळी ती ९ वर्षांची चिमुकली होती. डिसेंबर १९९८ मध्ये सायनाचे वडील तिला लालबहादूर स्टेडियममध्ये प्रशिक्षक नानी प्रसादकडे घेऊन गेले होते. त्या वेळी तिच्यात असलेला आत्मविश्वास पाहून प्रशिक्षक प्रसाद यांनी सायनाला ‘समर ट्रेनी’ म्हणून घेतले. तेथून सायनाची बॅडमिंटन क्षेत्राची खरी सुरुवात झाली. सायनाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा तिचा जागतिक क्रमवारीत ८६ वा क्रमांक होता. तिने अनेक गाजलेल्या दिग्गज बॅडमिंटनपटूंना चारीमुंड्या चीत केले. ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. तिने इंडोनेशिया चॅम्पियन लीन वॅनचा पराभव करीत सुपर सिरीज स्पर्धा जिंकण्याचा इतिहास घडविला. प्रतिष्ठेची एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन स्पर्धा दोनदा जिंकण्याचा पराक्रम करणारी सायना पहिली भारतीय ठरली आहे. २००८ मध्ये वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकाविले होते. तिने नववे मानांकन असलेल्या जपानच्या सपाका सटोचा २१-९, २१-१८ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले होते. २१ जून २००९ रोजी ती डब्ल्यू एफ सुपर सिरीजचे जेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करणार्‍या सायनाला ऑगस्ट २००९ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांना द्रोणाचार्य पुरस्काराने एकाच वेळी सन्मानित करण्यात आले होते. पदकांची कमाई केल्यानंतरही सायना शांत बसली नाही. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने जानेवारी २०१० मध्ये पद्मश्री ऍवार्ड मिळविला.
आयपीएलमधील डेक्कन चार्जर्स संघाची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असलेल्या सायनाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखून प्रत्येक स्पर्धेत भारताचे नाव झळकावत राहावे हीच अपेक्षा.

Wednesday, June 2, 2010

पहिला फ़ुटबॉल विश्वविजेता ठरलेला उरुग्वेचा संघ

हाच तो उरुग्वेचा फ़ुटबॉ संघ आहे ज्या संघाने १९३० साली पहिला फ़ुटबॉल विश्वचषक पटकविला होता. निर्णायक सामन्यात अर्जेंटीनाला ४-२ ने नमवत अजिंक्यपदाचा पहिला मान मिळविणारा उरुग्वेचा संघ आणि त्या संघासमोर सामन्यात खेळविण्यात आलेला चामड्याचा फ़ुटबॉल छायाचित्रात दिसत आहे.
अंतिम सामन्यात कोणता फ़ुटबॉल खेळविण्यात यावा या बाबत दोन्ही संघांमध्ये (अर्जेंटीना आणि उरुग्वे) एकमत होत नव्हते. परन्तु या निर्णायक सामान्यासाठी असे ठरविण्यात आले की, सामन्याच्या पुर्वार्धात अर्जेंटीनाचा फ़ुटबॉल वापरण्यात यावा आणि उत्तरार्धात उरुग्वेचा. घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार पुर्वार्धात अर्जेंटीनाचा फ़ुटबॉल खेळविण्यात आला त्यावेळी अर्जेंटीना संघ २- ने आघाडीवर होता. उत्तरार्धात उरुग्वेचा फ़ुटबॉल खेळविण्यात आल्यानंतर पिछाङीवर असलेल्या उरुग्वे संघाने दमदार पुनरागमन करत ४-२ ने अजिंक्यपद पटकावले. सामन्यातील पुर्वार्धात आणि उत्तरार्धात खेळविण्यात आलेल्या फ़ुटबॉलमुळे दोन्ही संघांनी चांगलाच फ़ायदा उठाविला. परन्तु फ़ुटबॉल बदलला आणि सामन्याचे चित्रही पालटले.

Saturday, May 22, 2010

लोकशाही देशात हुकुमशाही फतवा

एकीकडे भारत महासत्ता होण्याकड़े वाटचाल करत असताना दुसरीकडे त्याच भारतात शेळया-मेंढ्याप्रमाणे मुस्लिम महिलांना वागणूक देण्याचा निर्णय देवबंदच्यानुसार लावण्यात आला, हे ऐकून धक्काच बसला. फतव्यानुसार महिलांची मिळकत कुटुंबीयांनी स्विकारू नये. मुस्लिम महिलांनी पुरुषांबरोबर काम करणे बेकायदा असल्याचे म्हटले आहे. दारुल उलूम देवबंद या मुस्लिम संघटनेने पुन्हा एकदा फतवा काढत मुस्लिम समाजावर बंधने लादली आहेत. त्यामुळे फतवा म्हणजे बेबंदशाही आणि हुकुमशाही म्हणतात ती हीच का? असे म्हणावेसे वाटते.
अहो, आपल्या देशाला भूगोलाच आहे, इतिहास नाही असे म्हणावे लागेल, जर इतिहासाचा परिचय असता तर असे फतवे निघाले असते का? महिलांचा उद्धार व्हावा यासाठी भारतात अनेक थोर मंडळीनी जीवाचे रान केले. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणारया इंग्रजांच्या राजवटीत स्रीयांची सती जाण्याची प्रथा राजाराम मोहनरॉय यांनी बंद करत त्यांना आपला जगण्याचा अधिकार मिळवून दिला। महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्रीयांच्या उद्धारासाठी हयात असेपर्यंत कार्य केले. त्यांनी स्रीयांसाठी आपल्या देशात शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आणि स्रीयांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार बहाल केला. सावित्रीबाई फुले यांनी कितीतरी दुखद यातना भोगून कितीतरी संकटांना तोंड देऊन मान अपमान सहन करून मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यांनी अहोरात्र स्रीयांसाठी कार्य केले. म्हणून त्यांना स्रीयांचे उद्धारकर्ते म्हणतात. छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राजवटीत स्रीयांना आरक्षण दिले. मुलींसाठी शाळा , वसतीगृहे निर्माण केली. त्यांना समानतेचा दर्जा दिला म्हणून तर त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्रीयांसाठी, मुलींसाठी अविस्मरणीय असे कार्य केले. संत तुकाराम आणि गाडगे महाराज यांनी आपल्या अभंगातून आणि कीर्तनातून स्रीयांसाठी कार्य केले. या सर्वांच्याच मेहनतीचे फलितच, आज अनेक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसत आहे. त्या आपल्याला अनेक विभागात काम करताना दिसतात. रिक्षा चालिकापासून ते वैमानिकांपर्यंत, शिपयापासून ते अधिकार्यांपर्यंत, शिक्षिकेपासून ते मंत्र्यांपर्यंत, आज अनेकींनी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, आय.पी.एस.सारख्या उच्च नामांकित पदांवर आपला जम बसविला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या देशाचा पूर्ण कारभारही एक महिलाच पाहत आहे. कदाचित अमानुष फतवा काढणार्यांणा
याचा विसर पडला असावा. स्री-पुरुष समानता असलेल्या भारतात मुस्लिम समाजातील महिलांवर या फतव्यामार्फ़त लादण्यात येणारा निर्णय महिलांवर अत्याचार करण्यासारखा आहे. स्रीयांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करताना किंवा बोलताना ठराविक अंतर ठेवावे. त्यांनी कमाविलेला पैसा हा त्या कुटुंबासाठी हरामाचा पैसा असेल. हे म्हणजे स्रीयांची गळचेपी करण्यासारखे आहे. फतवा काढणार्यांणा कदाचित परिस्थितिचे चटके बसलेले नसावेत.
आज अशी कित्येक घरे आहेत की, त्या घरात केवळ एकाच्याच मिळकतीतून कुटुंब चलाविणे अशक्य आहे. कित्येक घरे अशी आहेत की, स्रीयांच्याच मिळकतीवर आधारलेले आहे. कुटुंबातील कमावता पुरुष जर घरच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास असमर्थ ठरत असेल तर काय करणार? उपाशीच राहाणार का ? आज महागाई इतकी वाढलेली आहे की एकाच्याच मिळकतीतून घर चलाविणे म्हणजे कमी पाण्यात होडी चालविण्यासारखे आहे. आशा परिस्थितीत जर स्रीयांनी मिळकतीसाठी हातभार लावला तर काय वाईट आहे. असे मला वाटते. (काम केलेच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नसावे, या बाबतचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा असावा.) लहान वयात शिक्षणासाठी शाळेत पाठवायच आणि मोठे झाल्यावर त्यांच्यावर अशाप्रकारच्या जाळ्यात अडकवत चार भिंतीत राहण्याची बंधने लादायची याला काय अर्थ आहे. अशाने प्रगति तर नाहीच पण अदोगती होणार यात अजीबात शंका नाही.
कामावर रुजू झाल्यावर अनेकांशी चर्चा होणारच. अशातच काम करत असलेल्या मुस्लिम महिलांना फताव्यानुसार वागण्यास अगदीच जड़ जाईल. मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना तो अनेकांशी नाते- संबंध जोडत असतो. त्यामुळे ठराविक अंतरावरून, पडद्या आडूनच किंवा पुरुषांच्या बरोबरीने काम न करने हे केसाने गळा कापण्यासारखे आहे. 'प्रगति केवळ पुरुषांचीच आणि स्रीया पुन्हा चुल आणि मूल पुरत्या मर्यादित' अशी अवस्था भारताच्या होणार्या प्रगतीला मोठा अड़थळा निर्माण करू शकते, असे वाटते. तसेच देशाच्या प्रगतीचा समतोल ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळकत मोठी असेल तरच विकास करणे शक्य आहे. शरियातिच्या कायद्याचे पालन न करानार्यांस अल्लाच्या दरबारात त्रास नक्कीच होइल, असे काही मंडळींकडून सांगण्यात येते. कदाचित असेलही, पण तो त्रास नंतर होणारा असेल, आधी होणार्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे त्याचे काय? यावर या संगठणांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल.
समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वांवर आधारित भारतीय राज्यघटना त्यावेळी कोट्यावधी लोकांनी मान्य केली असून आज अब्ज्यावधी लोकांना मान्य आहे असे असताना लोकशाही असलेल्या या देशात कोणीही उठतो आणि फतवे काढून हुकूमत गाजवत असतो. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. कोणत्याही धर्मापेक्षा देश मोठा असतो, म्हणून धर्म देशापेक्षा मोठा मानू नये. इतकेच धर्म वेडेपणा असाल तर धर्म हा केवळ घरापुरता मर्यादित ठेवावा. भारत देश संपूर्ण जगात अधिराज्य करणारा, महासत्ता होणार अशी आशा करत असताना या देशात काय चालले आहे, याकडे राजकारण्यांनी वेळ काढून विचार करावा.
आशाप्रकारचे फतवे काढणार्याँना देशाची राज्यघटना कळत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. जर त्यांना राज्यघटनाच मान्य नसेल तर लोकशाही प्रधान देशात त्यांना असे हुकुमशाहीचे जुल्मी फतवे काढण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांच्या धर्माचे स्वतंत्र कायदे असले तरी त्यांना याचे भान असायलाच हवे की, आपण भारतासारख्या देशात आहोत, ज्या देशात स्रीयांसाठी अनेकांनी अथक प्रयत्न केलेला इतिहास आहे. भारताकडे इतर देशांचा बघण्याचा दृष्टिकोण हा आदराचा आहे. या देशात स्री - पुरुष समानता आहे, असे असताना आशा या फताव्यासारख्या कृत्यामुळे देशाच्या प्रतिमेस धक्का तर लागत नाहिना याची जाणीव ठेवणे आवश्यक होते. ते जर जाणीवपूर्वक असे कृत्य करत असतील तर आशा प्रकारचे फतवे काढणार्यांना देशातून हाकलून देण्याशिवाय दूसरा पर्यायच उरणार नाही. भारताची प्रतिमा डागळवण्याचा प्रयत्न करणार्यांना भारतवाशी कधीच माफ़ करणार नाही तरच भारत प्रजासत्ताक आणि महासत्ताक होइल.